Wednesday, 23 October 2013

दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी

दिक्षा दिली.

 दुसर्‍या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे

विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी

भाषण दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत. तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने

दिशानिर्देश दिलेत त्यानुसार समाजबांधव वागला कां याचा विचार करणे आवश्यक आहे.

 बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की, ’आम्हाला इज्जत प्यारी आहे आहे, लाभ प्य्रारा

नाही.’

 केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले

होते की, ’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत.

त्यांना अन्न नाही. शेतीवाडी नाही अशी त्याची बिकट परिस्थिती असतांना मेलेली ढोरे

ओढू नका असे तुम्ही सांगत असल्यामुळे त्यांचे दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे ५००

रुपये उत्पन्नाचे नुकसान होते.’ तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की, ’तुम्ही, तुमचे पांच मुले,

तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला ५००

रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्याशिवाय मी दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था

करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून

घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे करीत नाही? आम्ही

हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही

मेलेली ढोरे…’

 दुसर्‍या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट, असेंब्ल्याच्या जागा कांसोडता असेविचारले

होते. त्यावर बाबासाहेब म्हणालेकी, ’तुम्ही महार बनून भरा.’

 म्हणून बाबासाहेब म्हणतात की, आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरीता! मनुष्य

मात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरितां आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग

करण्याची आमची तयारी आहे.

 काय बाबासाहेंबाच्या या म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे कां? की

स्वार्थासाठी वाटेल ते, प्रसंगी स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान ठेवायला मागेपूढे

पाहिले नाही. याचा जाब अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको कां?

 बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, ’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५

पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू

धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करुन

दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला

वाटते.’

 काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे

कां? असा प्रश्‍न आम्ही स्वत:ला विचारायला नको कां?

 पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात

यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’

 काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार, समाजबांधवांनी बौध्द धम्म आतातरी पटवून

घेतला आहे कां? धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून सांगितली काय? याचा

जाब प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?

 भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा सागराप्रमाणे

आहे. या संघात सर्व सारखे व समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे

महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली

जात जाते व सर्वजण समान असतात.

 काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा विचार करतो काय? याचा जाब अशा लोकांनी

विचारायला नको काय?

 बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास ग्लानी कां येते? या राजा मिलिंदानी विचारलेल्या

प्रश्‍नाला भन्ते नागसेनाने दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे सांगितली

आहेत.

१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य

नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार अशा धर्म टिकतो.

२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते.

ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे

प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला ग्लानी येते.

३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व

सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन

करतात.

 बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली

पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही काला पुरती) आहेत असे कोणासही म्हणता

यावयाचे नाही.

 काय धम्म प्रचारासाठी व गांवा-गांवात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे

बांधण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत: शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार घ्यायला

नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग

बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे

नेण्याची जबाबदारी येऊन पडत नाही काय?

 बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल

इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म

म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या

दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीनेधर्म पाळण्याचा

निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असेहो‍ऊ नये,

म्हणून आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर

देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार

आहे.”

 काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा प्रयत्‍न केला काय किंवा करतो काय?

आपल्या कृतीने बुध्द धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर नाही ना? याचा

अंतर्मुख होवून सर्वांनी विचार करायला नको काय?

 बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प

केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू

नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.

 काय आपल्या उत्पनाचा विसावा हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण बाबासाहेबांच्या

कार्याकरीता योगदान देतो काय? कां हेही पैसे आपण आपल्याच घरात, शौकपाण्यासाठी

खर्च करतो? याचा विचार आपण करायला नको काय? हा पैसा बाबासाहेबांचा आहे आणि तो

मी बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च करेन याची जाणीव किती लोकांना आहे?

 भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की, “दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक

बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.”

 काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी बौध्द धम्म स्विकारावा म्हणून आपण अशी काही

यंत्रना निर्माण करु शकलो काय? याचा आम्ही विचार करायला नको काय?

 बाबासाहेबांचे भाषण व त्यावर आपली जबाबदारी याचा विचार करुन जर सर्वांनी एकत्र

येऊन एका सुत्रबद्द पध्दतीने व निष्ठापूर्वक रितिने वाटचाल करण्याचा निर्धार केला

तर खर्‍या अर्थाने बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे स्वप्‍न काही अंशी साकार

झाल्याशिवाय राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.