Friday, 28 March 2014

श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार आहे.

मुंबई- भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार असून भारतीय पद्धतीचे प्रशस्त बुद्धविहार देखील उभारण्यात येणार आहे. साधारणता एक ते दीड वर्षात हि संकल्पना प्रत्यक्ष स्वरुपात येणार आहे, तसेच या प्रस्तावित भवनाचे भूमिपूजन श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते तर अनावरण भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची योजना असल्याची माहिती इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे को-ऑडीनेटर तसेच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्यालयीन सचिव भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो यांनी दिली.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या धर्तीवर जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या नावाने भरीव कार्यक्रम आखून जगभरात नेटवर्क उभे करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून भारतीय बौद्धांच्या सहकार्याने कोलंबो शहरातील अरवल पन्निपिटिय या शहरात सव्वा दोन एकर जागेवर हे भवन उभे राहणारअसून इंडो- श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्क या संस्थेने हि जागा संपादित केली असल्याची माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली.

भारतीय बौद्धांच्या शिष्टमंडळाने डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली २२ फेब्रुवारी २०१३ रोजी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांची कॅन्डी येथे भेट घेतली होती. महाबोधी सोसायटीचे (श्रीलंका ) मरदान कोलंबो येथे चार मजली भव्य कार्यालय, बुद्धविहार, भिक्खू ट्रेनिंग सेंटर तसेच पूज्य भन्ते अनागरिक धम्मपाल यांचा पुतळा आहे. सदर भवनासमोर धम्मपाल यांच्या पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, कोलंबो तील भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच भारतीय पद्धतीच्या बुद्धविहार निर्मितीस या बैठकीत मान्यता देण्यात आली ,अशी माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली. गवर्नर टिकीरी कोब्बेकडून, डॉ. डब्लू. ए. आय. विक्रमसिंघे, डॉ. जीवक भंडार, माजी खासदार रामदास आठवले, अविनाश कांबळे, लॉर्ड बुद्ध चेनेलचे संचालक सचिन मून, भदन्त रेवत बोधी, इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे श्रीलंका को- ऑडीनेटर सेनक वीररत्ने, डॉ. लीलकनाथ विरसिंघे, संघनायक भदन्त किरम विमलज्योती महाथेरो यांच्यासह अनेक मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

सदर निर्णयाच्या अनुषंगाने इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कने कोलंबोपासून सात किलोमीटर अंतरावर अरवल पन्निपिटीय येथे सव्वा दोन एकर जागा संपादित करण्यात आली आहे. या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन कार्यदर्शन प्रदर्शन, फोटोबायोग्राफी, अध्ययन केंद्र रायटिंग अंड स्पीचेस सशोधन केंद्र, भारतीय भिक्खू-भिक्खुनी प्रशिक्षण केंद्र, भारतीयांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, विपश्यना केंद्र, पाली, संस्कृत भाषा सशोधन व प्रशिक्षण केंद्र , भारतीय आणि श्रीलंकन बुद्धिस्ट संस्कृती संशोधन आणि जतन केंद्र, सम्राट अशोक आणि अर्हत महेंद्र संशोधन केंद्र लायब्ररी, भिक्खू निवास मिटिंग हॉल आदीचा समावेश राहणारआहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचे महा बुद्धविहार देखील या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राहुल बोधी यांनी दिली. सदर जागेची पाहणी करण्यासाठी भारतीय बौद्धांचे शिष्टमंडळ डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या २५ सप्टेबर रोजी श्रीलंका दौ-यावर जाणार आहे.

या वास्तू उभारणीचा खर्च पूर्णपणे भारतीय बौद्धांनी उचलायचा आहे. या निधी संकलनासाठी लवकरच कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि मान्यवराच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास भन्ते डॉ. राहुल बोधी यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment