Monday, 24 March 2014

सांगलीला बाबासाहेबांची सभा सकाळी ११ वाजता होती

सांगलीला बाबासाहेबांची सभा सकाळी ११ वाजता होती, परंतु सकाळी ८ वाजता बाबासाहेब सभा स्थानी हजर . बाबासाहेबांना पाहताच संयोजकांची तारांबळ उडाली कारण स्टेजचा पत्ताच नव्हता. कार्यकर्ते झेंडे, पताका, झिरमोळ्या इत्यादी बांधण्यात गुंतले होते. कार्यकर्ते पडलेल्या चेहऱ्याने बाबासाहेबांची क्षमा मागू लागले . बाबासाहेब त्यांना म्हणाले...

' अरे क्षमा कसली मागता ! मीच दोन -तीन तास अगोदर आलोय , तुमचे चालू द्या . मी एकटाच शिवारातून फिरून येतो.'

बाबासाहेब बांधा -बांधाने, डौलदार , बहरदार पिक न्याहाळीत चालले होते. मनगटासारखे कांदे असलेल्या , जवळ जवळ पुरुष-दोन पुरुष उंच असलेल्या एका ऊसाच्या शेताच्या बांधा बांधाने चालले असताना ,अचानक बाबासाहेबांना एक हाक ऐकू आली. ' ओ पाव्हनं , ओ पाव्हनं , आवो इकडे या ' हाक मारणाऱ्या शेतकऱ्याच्या दिशेने बाबासाहेब गेले . तो शेतकरी म्हणाला , ' थोड इथं बस ' त्याने बनविलेल्या छोट्या ओट्यावर बसण्याची बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब त्या ओट्यावर बसले. तो शेतकरी ऊसाच्या मळ्यात गेला आणि एक रसदार ऊस तोडून घेऊन आला . त्या ऊसाचे कांडके पाडले. पाटाच्या पाण्याने ते स्वच्छ धुतले,ती ऊसांची काडंकी बाबासाहेबांसमोर धरून विनयशीलप्रमाणे तो शेतकरी म्हणाला ' पाव्हनं मारा ताव .ऊस लय गुळमाट हाय !बाबासाहेबांना खरच ऊस फार आवडला . शांतपणे ऊस खाणे संपल्यावर बाबासाहेबांनी पाटाच्या पाण्याने हात धुतले , आणि सभास्थानी निघणार , तोच तो शेतकरी बाबासाहेबांना अडवीत म्हणाला . ' पाव्हनं , मी तुम्हाला बाटवलय , तुम्हाला मी लाच दिलीय , फुकट ऊस व्ह्य दिला तुम्हाला . तुम्हाला माझ एक काम कराव लागल . ' कसले काम' बाबासाहेब म्हणाले ' अवो ,आज आमच्या गावात सभा हाय, त्या सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब येणार हायती, त्यास्नी मला लांबून दावा . आमच्या गावची म्हारं आज लय टेचात हायती, मला सभेच्या जवळ पास सुधा येवू देणार न्हायती.' ' का येवू देणार नाहीत ?' बाबासाहेब विचारते झाले. ' अहो माझ्या अंगात पण खोडीलपणा हाय, कि', ' त्या आंबेडकरांना पाहून तुम्ही काय करणार आहात ?' बाबासाहेबांनी शांतपणे प्रश्न विचारला .

' काय बी करणार न्हाय फकस्त डोळे भरून बघणार हाय . काय सांगू पाव्हनं तुम्हांला, एका डॉ. आंबेडकरांमुळे सारा समाज सुधारला. आमच्या गावातील म्हारं मेलेल्या म्हशी , रेडे, गाया, बैल यांचे मांस खायचे . जित्या म्हशी , रेडे बी कापून खात होती . घरात तर त्यांच्या वलानीला चान्या असायच्याच . त्या वाळवून केलेल्या बोटक्याच्या चुण चुण्या तर यांच्या हमेशा खिशात .बोटक्या तर त्यांच्या कोरड्यासांत असायाच्याच . त्यामुळे त्यांच्या तोंडाचा भापक्न वास मारायचा. आन कपडे तर गचाळच त्याला कवा तरी पाणी लावीत होते. पण त्या डॉ. आंबेडकरान सांगीतल्यापास्न गावतील म्हारं -पोरं बदलली . काय सायबावानी नटत्यात ! सगळ्यांनी मोठ्याच मटन सोडून तर दिलच, नव्हं तर घर भांडी- कुंडी ,कपडा-लत्ता चका चक , गावात नीटनेटके कापड घातलेला माणूस दिसला, कि त्यो म्हाराचाच असला पाहिजे असे म्हणत्यात . म्हणून पाव्हनं ते डॉ. आंबेडकर मला दावा , मी लांबून त्यांना बघीन , मनापास्न हात जोडीन आन म्हणीन धन्य ती मावली जिने ह्यो हिरा जन्माला घातला, आन साऱ्या समाजाला सूदरविल; त्यान सतरा पिढ्यांचा पांग फेडलं .' बाबासाहेब उभे राहिले व म्हणाले , ' बाबा , मीच तो आंबेडकर आहे .' तदक्षणी त्या वृद्ध शेतकऱ्याने बाबासाहेबांचे पाय धरले व पाया पडला .त्याने बाबांच्या डोक्याला दोन्ही हात लावून प्रेमाने दाही बोटे आपल्या कानशिलावर कडा - कडा मोडली , त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तोंडातून शब्द फुटत नव्हता, तरी तो शेतकरी म्हणाला,

' माझ्या जन्माचे सारतक झाले; गरिबांचे देव मी परत्यक्षात डोळ्यांनी बगीतला . मी त्या देवाला ऊसाचा निवद दिला, माझ शेत धन्य झाल.मी धन्य झालो , ह्यो कट्या पवितर झाला.

हि सत्य कथा इथच संपली नाही. सांगलीच्या त्या शेतकऱ्याने जेथे बाबासाहेब बसले होते तेथे सुंदर पार बांधला . तिथेच एक खोप बांधून रात्रन दिवस तो तीथेच राहू लागला . घराकडून तिन्ही वेळच जेवण मागवून तिथेच खावू लागला .त्या पारावर कुणालाही पाय ठेवू देत नव्हता, कि पक्ष्यांचे शीट देखील पडू देत नव्हता . कारण त्याच्या मते दलितांचा राजा दलितांचा देव जिथं बसला होता त्या पाराला पाय लावण्याची कोणाची हि लायकी नाही, हे पावन स्थान आहे.

आणि मरेपर्यंत तो शेतकरी त्या पाराची सेवा करीत तेथेच त्या पाराच्या पायथ्याशी 'निधन ' पावला.


जय भीम

No comments:

Post a Comment